मतदान न केल्याच्या रागातून तरुणास मारहाण; भाजप तालुकाध्यक्षासह पाच जणांविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
संगमेश्वर : तालुक्यातील गोठणे पुनर्वसन येथील तरुणाने निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले नाही, या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (१०) हातीव येथे घडली. या प्रकरणी भारतीय जनता पक्षचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध देवरूख पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (दोघेही रा. आंगवली) आणि प्रथमेश धामणस्कर (रा. देवरूख) यांच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी सुनील पवार व त्यांचे मित्र अंकुश उंडे आणि नीलेश पवार हे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हातीव येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी गावातील प्रकाश उंडे यांनी ‘निवडणुकीत मदत न करणारे मित्र हॉटेलमध्ये आहेत,’ अशी माहिती दूरध्वनीवरून रुपेश कदम यांना दिल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यानंतर भाजपला मतदान न केल्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी सुनील पवार व त्यांच्या मित्रांवर धाव घेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) (३) अन्वये जारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.