घरातच प्रसूती; १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतः नाळ कापली, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : पुण्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरामध्येच बाळाला जन्म देऊन स्वतःच नाळ कापल्याची हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. सध्या मुलगी व नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ३१ जानेवारी रोजी सकाळी माहेरी आल्या असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर लहान बहिणीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच फरशीवर आणि दरवाजाजवळ रक्ताचे डाग दिसल्याने कुटुंबीय हादरले. पुढे खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले आढळल्याने धक्क्याचे वातावरण निर्माण झाले.
कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर अल्पवयीन मुलीने घरातच प्रसूती झाल्याचे सांगितले. तसेच बाळाची नाळही स्वतःच कापल्याचे तिने कबूल केल्याचे पोलिसांनी नमूद केले. पुढील चौकशीत मुलीने मागील वर्षभर आदिल फारुख शेख (२४) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. या कालावधीत दोन ते तीन वेळा शरीरसंबंध झाल्याचेही तिने नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कुटुंबीयांनी तातडीने मुलीला व बाळाला रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत मुलीच्या मोठ्या बहिणीने फिर्याद दिल्यानंतर आदिल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.