इमारतीच्या आवारात खेळत असलेल्या लहान मुलाला भरधाव इनोव्हा कारने चिरडले; चिमुरड्याचा जागीच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – इमारतीच्या आवारात खेळत असलेल्या लहान मुलाला भरधाव इनोव्हा क्रिस्टा कारने चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत चार वर्षांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या वीस वर्षांनी झालेलं अपत्य नियतीने क्रूरपणे हिरावल्याने मायबाप हतबल झाले आहेत.
मुंबईतील मालाड पूर्व येथील निलयोग विराट इमारतीत राहणाऱ्या सिंग कुटुंब पाच तारखेला लग्न सोहळा झाला. लग्नानंतर संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमा झालं होतं. सात फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यापैकी चार वर्षांचा चिमुरडा लक्ष सिंग हा इमारतीच्या खाली खेळत असताना काळ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा कारने वेगाने येऊन त्याला चिरडले. त्यानंतर चालकाने वॉचमनला घटनेची माहिती दिली आणि पळून गेला.
मुलाचे वडील जयप्रकाश सिंग यांनी सांगितलं की लग्नानंतर २० वर्षांनी त्यांना मुलगा झाला होता. मात्र त्यांचा लाडका मुलगा एका अपघाताने कायमचा हिरावला. घटनेनंतर चालकाने मुलाला रुग्णालयात नेलं असतं, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.त्यांनी असाही आरोप केला की गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ हॉलिडे कोर्टात हजर केले आणि पोलिस कोठडी मागितली नाही. पोलिस जामीन देण्याच्या तयारीत होते. सिंग कुटुंबाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात धाव घेतली, तेव्हा पोलिसांनी त्याचा जामीन रोखला.
मुलाला चिरडल्यानंतर आरोपीने फरफटत नेल्याचा आरोप करत सिंग कुटुंबाने हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लक्ष्यला चिरडल्यानंतर तो गाडी सोडून पळून गेला, त्यानंतर इमारतीचा सुरक्षा रक्षक त्याला हातात घेऊन जाताना दिसत आहे.दिंडोशी पोलिसांनी सांगितले की, एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रमेश देवजी जटारा आहे. तो संबंधित इमारतीच्या परिसरात त्याची कार पार्क करतो पण दुसरीकडे राहतो.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार वर्षांच्या मुलाला चिरडल्यानंतर अचानक गाडी थांबताना दिसत आहे. काही वेळानंतर, वॉचमन मुलाला हातात घेऊन पळत जाताना दिसतो आणि त्यानंतर लगेचच चालक इनोव्हा गाडीतून पळून जाताना दिसतो.