ऑनलाइन मूव्हर्सकडून अभिनेत्रीची फसवणूक; मुंबई पोलिसांची तत्काळ कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबईत घर शोधणे जितके अवघड आहे, तितकेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर शिफ्ट करणेही किचकट ठरत आहे. या अडचणीचा फायदा घेत ऑनलाइन मूव्हर्स अँड पॅकर्सच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या हिंदी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशी चौधरी हिची अशाच ऑनलाइन मूव्हर्सकडून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. अभिनेत्री खुशी चौधरी ही ‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात ओळखली जाते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुशी चौधरी यांना मुंबईहून उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घरातील सामान पाठवायचे होते. यासाठी त्यांनी ऑनलाइन माध्यमातून मूव्हर्स अँड पॅकर्सची सेवा बुक केली. काही दिवसांत संबंधित कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी आले. घरातील सामानाचे वजन करून ते टेम्पोमध्ये भरले गेले. यावेळी ११ हजार ७०० रुपयांचे बिल देण्यात आले आणि तीन दिवसांत सामान गाझियाबादला पोहोचेल, असे आश्वासन देण्यात आले.
मात्र, त्यानंतर फसवणुकीचा प्रकार सुरू झाला. संबंधित मूव्हर्स अँड पॅकर्सकडून वारंवार फोन करून शिपमेंटमध्ये बदल झाल्याचे सांगण्यात आले. सामानाचे वजन दुप्पट झाल्याचे कारण पुढे करत अधिक पैशांची मागणी करण्यात येऊ लागली. तब्बल महिनाभर वेगवेगळी कारणे सांगून अभिनेत्रीला टाळाटाळ करण्यात आली. अखेर सामान न पोहोचता सतत पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे अभिनेत्रीच्या लक्षात आले.
यानंतर खुशी चौधरी यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली. तसेच अभिनेत्रीचे घरगुती सामान चांदीवली परिसरातील एका गोदामातून जप्त करून सुरक्षितपणे त्यांना परत करण्यात आले.
या प्रकरणातील तातडीच्या कारवाईबद्दल अभिनेत्री खुशी चौधरी यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले. दरम्यान, ऑनलाइन माध्यमातून मूव्हर्स अँड पॅकर्सची सेवा घेताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.