टॅक्सीचालकाची मनमानी, अवघ्या काही किमीसाठी प्रवाशांकडून घेतले २ हजार रूपये; पोलिसांकडून टॅक्सी जप्त करत चालकास अटक

Spread the love

टॅक्सीचालकाची मनमानी, अवघ्या काही किमीसाठी प्रवाशांकडून घेतले
२ हजार रूपये; पोलिसांकडून टॅक्सी जप्त करत चालकास अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत जगभरातून प्रवासी येत असतात. मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवासी कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येतात. मात्र, या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक केली जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत २४ ते २६ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन पूर्व या ठिकाणी दोन टॅक्सीचालक आणि त्यांच्या साथीदाराने दोन प्रवाशांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील टॅक्सीचालकाने प्रवाशांना अनुक्रमे १८०० रुपये आणि २००० रुपयांची फसवणूक केल्याने सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून एकूण ०७ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणुक केलेली मालमत्ता तसेच ०४ टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईत बहुतांश ठिकाणी टॅक्सी चालकांची दादागिरी पाहायला मिळते, अनेकदा मीटर बंद ठेऊनच प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडण्यात येते. याबाबत परिवहन विभागाने कारवाईचे निर्देश दिले असतानाही टॅक्सी चालकांची ही मुजोरी मुंबईत ठिकठिकाणी पाहायला मिळते. नुकतेच, दादरमध्ये काही टॅक्सी चालकांच्या मनमानीचा कारभार उघडकीस आला आहे. अवघ्या काही किलोमीटर प्रवासासाठी प्रवाशांकडून तब्बल २ हजार रुपये भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत यासंदर्भाने पोलिसांत धाव घेतली. दादर ईस्ट परिसरात काही ठराविक टॅक्सी चालकाकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याची नोंदही पोलिसांकडे आहे. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने वारंवार टॅक्सी चालकांकडून असे प्रकार घडत आहेत.आता, प्रवाशांकडून जास्त पैसे आकारल्याने माटुंगा पोलिसांनी टॅक्सी चालकांच्या मुसक्या आवळत ४ टॅक्सी जप्त केल्या आहेत.यात दोन टॅक्सी चालकांसह ७ जणांना अटक करण्यात आलीय.

दरम्यान, मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशन पूर्व परिसरात, माटुंगा स्टेशन परिसरात आणि माहेश्वरी उद्यान सर्कल परिसरात एकूण ९८ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच, बीएमसी एफ नॉर्थ वार्ड यांचेसह संयुक्त कारवाई करून दादर रेल्वे स्टेशन पूर्व परिसर अनधिकृत फेरीवाले मुक्त परिसर करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon