कासारवडवलीत इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडले; ५३ मोबाईलसह सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल लंपास

Spread the love

कासारवडवलीत इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडले; ५३ मोबाईलसह सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल लंपास

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाण्यात रेल्वे हद्दीतील चोरीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी शहरातील व्यापारी परिसराकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडबंदर रोडवरील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ५३ मोबाईल फोनसह स्मार्ट घड्याळे आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.

घोडबंदर रोडवरील साई निवास इमारतीत असलेल्या ‘ओम साईराम इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात ही चोरी झाली. याप्रकरणी दुकानदार अशोक वैष्णव (वय ५१) यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून वैष्णव घरी गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, शटरचा लोखंडी ग्रीस तोडलेला, शटर वाकवलेले तसेच दोन्ही बाजूंचे कडी-कोयंडे तुटलेले आढळून आले. दुकानात प्रवेश करताच काउंटर व रॅकमधील विक्रीसाठी ठेवलेले मोबाईल व इतर साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या चोरीत विविध कंपनीचे एकूण ५३ नवीन मोबाईल फोन, पाच स्मार्ट घड्याळे, वायफाय सेटअप बॉक्स तसेच सुमारे दीड हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरी गेलेल्या मोबाईल व अन्य साहित्याची एकूण किंमत सुमारे सात लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घोडबंदर रोडसारख्या वर्दळीच्या भागात दुकान फोडून चोरी झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कासारवडवली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon