वसई–विरारमध्ये पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी ‘कोम्बिंग’ कारवाई; २३१ नायजेरियन नागरिकांना अटक, ४० अनधिकृत दुकाने सील
पोलीस महानगर नेटवर्क
वसई–विरार : वसई–विरार परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक ‘कोम्बिंग’ कारवाई राबवली. या संयुक्त कारवाईत वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या तब्बल २३१ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ४० अनधिकृत दुकानांवरही कारवाई करत ती सील करण्यात आली. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वसई–विरारमधील काही इमारतींमध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास होते. केवळ वास्तव्यच नव्हे, तर या नागरिकांनी विविध ठिकाणी अनधिकृत व्यावसायिक गाळेही सुरू केले होते. यामध्ये ब्युटी पार्लर, कपड्यांची दुकाने, चायनीज फूड स्टॉल, किराणा दुकाने, हेअर सलून तसेच बारचा समावेश होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने अचानक संयुक्त कारवाई करत संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या वेळी संबंधित नागरिकांकडील पासपोर्ट, व्हिसा आदी वैध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र, चौकशीदरम्यान एकाही नायजेरियन नागरिकाला भारतात वास्तव्य करण्यासंबंधीची वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत. अनेकांचा व्हिसा मुदत संपलेला असून काहींकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.
कागदपत्रांचा अभाव आढळताच पोलिसांनी तात्काळ धरपकड सुरू करत २३१ नायजेरियन नागरिकांना अटक केली. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली ४० अनधिकृत दुकाने बंद करून सील करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर वास्तव्य आणि अनधिकृत व्यवसायांवर मोठा वचक बसला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.