अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दु:खवट्याच्या काळातच सब-जेलरचा वाढदिवस; बार्शी तहसील कार्यालयातील प्रकाराची चौकशी सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असताना, राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दु:खवटा जाहीर केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियोजित दौरे व कार्यक्रम रद्द करून संवेदना व्यक्त केल्या. मात्र, याच शोककाळात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसील कार्यालयात घडलेल्या एका प्रकारामुळे प्रशासनाची संवेदनशीलता आणि शिस्त यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दिवशीच बार्शी तहसील कार्यालयातील सब-जेल विभागात सब-जेलरचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सेलिब्रेशनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. शासकीय दु:खवटा असताना तसेच कार्यालयीन आवारात कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्यास मनाई असतानाही हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
राज्यात २८ ते ३० जानेवारी या कालावधीत शासकीय दु:खवटा पाळण्यात येत असताना, बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारात २९ जानेवारी रोजी सब-जेल विभागात महसूल सहाय्यक व जेलर संदीप नालपे यांनी वाढदिवस साजरा केल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यालयात केक कापणे, पुष्पहार घालणे अशा प्रकारे कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे, गृहविभागाच्या नियमांनुसार शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ, वाढदिवस किंवा सत्कार कार्यक्रम घेण्यास स्पष्ट मनाई आहे.
अजित पवार यांना प्रशासनातील शिस्त आणि कठोर कार्यपद्धतीसाठी ओळखले जात असताना, त्यांच्या निधनाच्या दिवशीच शासकीय कार्यालयात अशा स्वरूपाचा कार्यक्रम झाल्याने प्रशासनाची मान खाली गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकारामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.