पुणे शहरात कोयता गँगच्या दहशतीने धुमाकूळ;चार तरुण आणि एका महिलेचा समावेश.

Spread the love

पुणे शहरात कोयता गँगच्या दहशतीने धुमाकूळ;चार तरुण आणि एका महिलेचा समावेश.

योगेश पांडे – वार्ताहर

पुणे – पुणे शहरात कोयता गँगच्या दहशतीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, हडपसर भागातील बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी रात्री या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. भरवस्तीत शिरलेल्या एका गँगने केवळ दहशतच माजवली नाही, तर सहा दुकानांचे शटर आणि काचा फोडून मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, या टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जेव्हा लोक आपापल्या घरी जात होते, तेव्हा अचानक चार तरुण आणि एक महिला हातात धारदार कोयते घेऊन बी. टी. कवडे रस्त्यावर उतरले. या सर्वांनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला मास्क लावले होते. हातात धारदार कोयते नाचवत त्यांनी आरडाओरडा केला आणि परिसरातील नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावरील लोकांची एकच धावपळ उडाली.

यानंतर टोळीने आपला मोर्चा रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांकडे वळवला. त्यांनी एकामागून एक अशा तब्बल सहा दुकानांवर कोयत्याने प्रहार करत काचा फोडल्या. एवढ्यावरच न थांबता, रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरही या गुंडांनी कोयते मारले. वाहनांच्या काचा फुटल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

पुण्यातील कोयता गँगमध्ये आतापर्यंत केवळ पुरुष टोळ्यांचा सहभाग दिसून येत होता. मात्र, बी. टी. कवडे रस्त्यावरील या घटनेत एका महिलेनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या टोळीचे नेतृत्व किंवा सहभाग असलेली ही महिला कोण? आणि ‘लेडी डॉन’ बनण्याच्या नादात पुण्यातील तरुणी गुन्हेगारीकडे वळत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon