एक्सपायरी केक विक्रीचा धक्कादायक प्रकार; ढोकाळीतील डी-मार्टविरोधात तक्रार

एक्सपायरी केक विक्रीचा धक्कादायक प्रकार; ढोकाळीतील डी-मार्टविरोधात तक्रार

ठाणे : ठाणे शहरातील ढोकाळी परिसरातील डी-मार्टमध्ये एक्सपायरी तारीख उलटून गेलेल्या केकची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’च्या ‘गोब्बल्स’ (Gobbles) ब्रँडचे केक एक्सपायर होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित केकची एक्सपायरी तारीख १९ एप्रिल २०२६ होती. मात्र २ मे २०२६ रोजीदेखील ५० हून अधिक पाकिटे स्टोअरमधील रॅकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. यातील काही उत्पादनांची बिलिंगदेखील सुरू असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, ग्राहक अ‍ॅड. मिलिंद जाधव यांनी ३० एप्रिल रोजी हा केक खरेदी केला होता. २ मे रोजी सायंकाळी केक सेवन केल्यानंतर त्यांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी उत्पादनावरील तारीख तपासली असता, केकची एक्सपायरी १९ एप्रिललाच झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील पाहणीत स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपायरी केकचा साठा असल्याचे आढळले.

या प्रकाराची माहिती मिळताच भाजपचे अखिलेश पाल व राकेश मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन छायाचित्रे व व्हिडिओद्वारे पुरावे गोळा केले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रदीप पुर्णेकर यांच्यासह संबंधितांनीही या प्रकरणाची दखल घेतली.

विशेष म्हणजे, संबंधित केक हे लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केले जाणारे उत्पादन आहे. त्यामुळे एक्सपायरी खाद्यपदार्थांची विक्री ही नागरिकांच्या, विशेषत: मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

याप्रकरणी अखिलेश पाल व अ‍ॅड. मिलिंद जाधव यांनी कापूरबावडी पोलीस ठाणे तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon