मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई! दिवा परिसरातून २४.२० किलो गांजा जप्त; २ इसम व १ महिलेस अटक
पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिवा परिसरात मोठी कारवाई करत तब्बल २४.२० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी २ इसम व १ महिला अशा तिघांना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे मुंब्रा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिवा परिसरात सापळा रचत संशयितांवर छापा टाकला. तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण वजन २४.२० किलो असून त्याची बाजारातील किंमत मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या तिघांकडून गांजाचा स्रोत, वाहतूक व वितरण याबाबत सखोल तपास सुरू आहे.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.