कल्याणच्या दुर्गाडी चौकात तरुणांची ट्रॅफिक पोलिसाला मारहाण; शिंदे गटाशी कनेक्शन
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – राज्यातील विविध भागांमध्ये गुन्हेगारी घटना समोर येत असतानाच आता कल्याणमध्ये काही तरुणांनी एका वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या दुर्गाडी चौकात हा प्रकार घडला. या तरुणांनी वाहतूक पोलिसाचा शर्ट फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या तरुणांचे राजकीय लागेबांध असल्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कल्याणच्या दुर्गाडी चौक परिसरात वाहतूक पोलीस कर्मचारी विलास भागीत यांना तरुणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. गाडी राँग साईडने का नेत आहे, असा जाब विचारल्यावर या तरुणांना राग आला आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. यामध्ये वाहतूक पोलीस अधिकारी विलास भागीत हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली आहेत. मारहाण करणारे तरुण शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर संबंधित या तरुणांचे मित्र हे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतानाही दिसले. हो आम्ही त्यांना पळवलंय, आमच्याशी धक्काबुक्की करु नका. आमच्यावर कारवाई करुन बघा, असे आवाहन हे तरुण पोलिसांना देत होते. तरुणांचे हे टोळके पोलिसांशी अत्यंत उर्मट आणि मोठ्या आवाजात हुज्जत घालत होते. यावेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.