ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘१०० दिवस कृती आराखडा’अंतर्गत तक्रार निवारण दिन; ७१५ तक्रारींची तात्काळ सोडवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘१०० दिवसांच्या कृती आराखडा’अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (२४ जानेवारी) आणि रविवार (२५ जानेवारी) या दोन दिवसांत पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींवर थेट सुनावणी घेण्यात आली.
या तक्रार निवारण दिनासाठी एकूण १,३२० अर्जदारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ८११ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
तक्रार निवारण दरम्यान ७१५ अर्जांची अर्जदारांच्या समक्ष तात्काळ निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जांबाबत संबंधित अर्जदारांना बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य ती कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून जागेवरच तक्रारी ऐकून त्यावर कार्यवाही करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ठाणे शहर पोलीसांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विशेष आभार मानले आहेत.