काँग्रेस समर्थक गुंडांकडून पत्रकारावर हल्ला; कारण नसताना अमानुष मारहाण
रवि निषाद / मुंबई
मुंबई : चेंबूर पश्चिमेतील मनपा प्रभाग क्रमांक १५० मध्ये मतदानाच्या दिवशी काँग्रेस समर्थक गुंडांकडून एका दैनिक मराठी वृत्तपत्राच्या पत्रकारावर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पी. एल. लोखंडे मार्गावरील मच्छी मार्केटसमोर घडली. पीडित पत्रकारानुसार, हल्लेखोरांची संख्या सुमारे २० ते २५ होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास चेंबूर येथील मच्छी मार्केटजवळील मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती आणि आपापसात वाद सुरू होता. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच संबंधित पत्रकाराने परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गर्दी पांगवली.
यानंतर सदर पत्रकार टिळकनगरच्या दिशेने बातमी संकलन करून मित्राच्या दुचाकीवरून त्याच मार्गाने परत जात असताना, त्याच ठिकाणी जमलेल्या गर्दीतून काही काँग्रेस समर्थक गुंडांनी त्यांना दुचाकीवरून खाली ओढत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, एका काँग्रेस खासदाराच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यानंतर पत्रकार कसाबसा आपला जीव वाचवून घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती पोलीस उपायुक्त समीर शेख यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार टिळकनगर पोलिसांनी या गंभीर प्रकरणात केवळ एन.सी. दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याच रात्री सुमारे दोनच्या सुमारास एका काँग्रेस खासदाराने आपल्या खासगी सचिवाच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून पीडित पत्रकाराला धमकावल्याचेही समोर आले आहे. यावेळी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम गुरुशाळे आणि पोलीस उपनिरीक्षक अमर शेड़गें उपस्थित होते, अशी माहिती आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अहवाल पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्याकडे सादर करण्यात आला. अहवालात पीडित पत्रकाराच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर असून गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट नमूद होते. हा अहवाल पाहून उपायुक्तही अचंबित झाले आणि त्यांनी पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, टिळकनगर पोलिसांनी केवळ सौम्य कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपींना वाचवण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
पीडित पत्रकाराच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात भादंवि कलम ३२६ तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक असतानाही पोलिसांकडून दिरंगाई व दुर्लक्ष केले जात असल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पीडित पत्रकार अद्याप चालण्याफिरण्यास असमर्थ असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोट
पोलिसांची भूमिका संशयास्पद:
दरम्यान श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी पत्रकारावर झालेल्या भेकड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याची बूज राखून हल्लेखोरांवर कारवाई करावी, अन्यथा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असे सिद्ध होईल. नाहीतर पत्रकार संरक्षण कायदा नुसता कागदावर वाचण्यापुरता राहील.