निगडी परिसरात मोठी कारवाई : ‘साईकृपा लॉज’वर छापा, मॅनेजर अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
निगडी : भक्ती–शक्ती चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पिंपरी–चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धडक कारवाई करत ‘साईकृपा लॉज’वर छापा टाकला. या कारवाईत लॉजचा मॅनेजर असलम शेख याला अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेला या चक्रातून मुक्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजमध्ये पैशांचे आमिष दाखवून महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून छापा टाकला. छाप्यादरम्यान मॅनेजर असलम शेख हा या अनैतिक व्यवसायात सक्रिय सहभाग घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात लॉजचा मालक अशोक काळे तसेच अन्य एका महिला आरोपीचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिलेची सुटका करून तिला आवश्यक ती मदत व संरक्षण देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.