नोकरीचे आमिष; महिला शिक्षिकेची ४० लाखांची सायबर फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मिरा रोड : परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्यांनी एका महिला शिक्षिकेची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. युकेमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी या शिक्षिकेकडून ४० लाख १ हजार ५०० रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथील रोझविला इमारतीत राहणाऱ्या ४७ वर्षीय शिक्षिका सेनेरिटा कॅझिटन डिसिल्वा यांच्याशी आरोपींनी संपर्क साधत युकेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे व तेथे नेण्याचे आश्वासन दिले. हा प्रकार ५ ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडला.
फिर्यादीला युकेला पाठवण्यासाठी आमचा माणूस दिल्ली विमानतळावर पाठवला असल्याचे आरोपींनी सांगितले. पुढे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी पाउंडसह त्या व्यक्तीला पकडल्याचा बनाव रचत, त्याची सुटका करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. या कथानकावर विश्वास ठेवून शिक्षिकेकडून विविध कारणे सांगत रक्कम उकळण्यात आली.
आरोपींनी वेळोवेळी बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास, तसेच जी-पे, एटीएम डिपॉझिट मशीन आदी माध्यमांतून एकूण १२ वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास भाग पाडले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी सेनेरिटा डिसिल्वा यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.