संभाजीनगरमध्ये विवाहानंतर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; ‘नवस–ब्रह्मचर्या’च्या आड पतीची नपुंसकता लपवली, सासरच्या १० जणांवर गुन्हा

Spread the love

संभाजीनगरमध्ये विवाहानंतर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; ‘नवस–ब्रह्मचर्या’च्या आड पतीची नपुंसकता लपवली, सासरच्या १० जणांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : विवाहसंस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आणि महिलांच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या मुलामधील नपुंसकत्व लपवण्यासाठी ‘देवाचा नवस’ आणि ‘ब्रह्मचर्य’ अशी कारणे पुढे करून नववधूची दिशाभूल करण्यात आली. अखेर या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या एकूण दहा जणांविरोधात फसवणूक व छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीचा विवाह काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहानंतर काही दिवसांतच पतीचे विचित्र वर्तन तिच्या लक्षात आले. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीने शारीरिक संबंध टाळण्यास सुरुवात केली. पत्नीने याबाबत विचारणा केली असता, “मी देवाला नवस बोललो असून काही काळ ब्रह्मचर्य पाळावे लागेल,” असे कारण देत त्याने विषय टाळला.

धर्माच्या नावाखाली दिलेल्या या कारणावर सुरुवातीला पत्नीने विश्वास ठेवला. मात्र, महिने उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने तिला संशय आला. तिने सासू-सासऱ्यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पतीला वैद्यकीय तपासणीसाठी प्रवृत्त केल्यावर त्याने सतत टाळाटाळ केली.

अखेर वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांतून पती नपुंसक असल्याची बाब समोर आली. ही बाब विवाहापूर्वीच सासरच्या मंडळींना माहिती असूनही ती जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडित विवाहितेने जाब विचारताच सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. माहेरून पैसे आणण्याचा तगादा, शिवीगाळ आणि अपमान सहन करावा लागल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू, सासरे, दीर, जावा, नणंद व इतर नातेवाईक अशा एकूण दहा जणांविरोधात फसवणूक (कलम ४२०), विश्वासघात आणि विवाहितेचा छळ (कलम ४९८-अ) यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon