भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अजित पवार गटाच्या आमदाराच्या पुतण्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक झालेल्या अजित पवार गटाच्या आमदाराच्या पुतण्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – शहापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांना आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. कारागृहात असतानाच हरेश दरोडा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहापूर तालुक्यासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शहापूर तालुक्यात खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या भात खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तपासात असे उघड झाले की, साकडबाव केंद्रांतर्गत १३ हजार ८९२ क्विंटल भात खरेदी दाखवण्यात आली होती. यापैकी ८ हजार ७७१ क्विंटल भात भरडाईसाठी उचलण्यात आला. मात्र, उर्वरित ५ हजार १२० क्विंटल भात प्रत्यक्षात शिल्लक आढळून आला नाही. या प्रकारामुळे सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा, तसेच आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतकऱ्यांच्या खोट्या व बोगस चलन पावत्या तयार करून तब्बल पाच हजार क्विंटल भात खरेदीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर हरेश दरोडा यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, कारागृहात असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon