पोलीस कोठडीत तरुणाचा गळफास; नागपुरात खळबळ, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका १९ वर्षीय आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र भाटिया (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता.
राजेंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असून, शिक्षणासाठी तो नागपुरात आला होता. याच दरम्यान त्याचे एका १६ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला. या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास करून राजेंद्रला प्रयागराज येथून अटक केली आणि नागपुरात आणले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
गुरुवारी (२२ जानेवारी) पहाटेच्या सुमारास राजेंद्रने कोठडीत उपलब्ध असलेल्या चादरीचा वापर करून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळच्या नियमित तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेने पोलीस कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी कोठडीवरील पहाऱ्याची जबाबदारी असलेले पोलीस कर्मचारी भारत–न्यूझीलंड क्रिकेट सामना पाहण्यात मग्न होते आणि नंतर झोपल्याचा आरोप करण्यात येत आहे. राहुल चौहान आणि प्रमोद दुधकवरे अशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे समोर येत आहेत. या कथित हलगर्जीपणामुळेच आरोपीला आत्महत्या करण्याची संधी मिळाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, नियमानुसार न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.