वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; पिकअप टेम्पो जळून खाक

Spread the love

वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; पिकअप टेम्पो जळून खाक

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवरील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अनेक गॅस सिलेंडरचा एकामागे एक स्फोट झाल्याने, या स्फोटाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी वाशी नाका इथे गॅस सिलेंडरने भरलेल्या पिकअप टेम्पोला अचानक आग लागली. या पिकअप टेम्पोमध्ये तब्बल आठ गॅस सिलेंडर होते. या गॅस सिलेंडरला आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलं. एकामागोमाग एक सिलेंडरे स्फोट झाले आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झालं. या सिलेंडरच्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुदैवाने या गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिलेंडरचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावरून सुरक्षित अंतर राखत पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने वेळेत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं, अन्यथा आजूबाजूच्या परिसराला, वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता.

महत्त्वाची बाब म्हणजे, अशाप्रकारे आगीची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर २०२५ मध्येही वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरशी संबंधित दुर्घटना घडली होती. अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा अशी गंभीर घटना घडल्याने गॅस सिलेंडर वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमांचं पालन होतं का, सिलेंडर वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, असे सवाल उपस्थित होत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनांमुळे वाशी नाका परिसरात सिलेंडर स्फोटांची जणू मालिका सुरू असल्याचं आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, गॅस सिलेंडर वाहतुकीसाठी जे नियम आहेत, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon