उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का; १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सरिता म्हस्के या शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची माहिती आहे. शिवसेना उबाठाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बुधवारी शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली होती. पण त्या बैठकीला म्हस्के गैरहजर होत्या. ठाकरेसेनेचे सगळे नगरसेवक कोकण भवनात गट स्थापना करण्यासाठी गेले होते. तिथेही म्हस्के नव्हत्या, अशी मागणी समोर येत आहे.
डॉ. सरिता म्हस्के प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आल्या. अवघ्या पाच दिवसांपूर्वी निवडून आलेल्या म्हस्के शिंदेसेनेला गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी मुंबईतील दादरमध्ये शिवसेना भवनात सगळ्या नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला म्हस्के अनुपस्थित होत्या. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. पण त्या नॉट रिचेबल असल्याचं समजलं.
शिवसेना उबाठाचे नगरसेवक बुधवारी नवी मुंबईतील कोकण भवनात गेले होते. गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक बसने दादरहून बेलापूरला गेले. या बसमध्येही सरिता म्हस्के नव्हत्या. त्या शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे. तसं झाल्यास तो उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीनंतर पहिला धक्का असेल. सरिता म्हस्के यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र म्हटल्यास पक्षाचं महापालिकेतील संख्याबळ ६४ वर येईल. उद्धव ठाकरेंनी अतिशय अवघड स्थितीत पक्षाला चांगलं यश मिळवून दिलं. २०१७ मध्ये निवडून आलेल्या ८४ पैकी ५० हून अधिक नगरसेवकांनी साथ सोडलेली असताना ठाकरेंनी ६५ जागा निवडून आणल्या. पण निकालानंतर अवघ्या पाच दिवसांनंतर ठाकरेंना धक्का बसताना दिसत आहे.
डॉ. सरिता म्हस्के यांना मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५७ मधून १४ हजार ७४९ मतं मिळाली. त्या १ हजार ८०३ मतांनी विजयी झाल्या. या प्रभागात राजकीय वर्चस्व असलेले भाजप नेते ईश्वर तायडे यांच्या पत्नी आशा तायडे यांचा पराभव करुन म्हस्के निवडून आल्या आहेत. आशा तायडे यांना १२ हजार ९४६ मतं मिळाली.