महाराष्ट्रात गुजरातीचा कळवळा? वाहतूक अधिसूचनेवर संतापाची लाट
पोलीस महानगर नेटवर्क
डहाणू : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (राष्ट्रीयमहामार्ग-४८) १९ व २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेत मराठी व हिंदीबरोबरच गुजराती भाषेचा समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्रातील अधिसूचनेत गुजरातीला इतके महत्त्व देण्यामागे नेमका हेतू काय, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. शेजारील गुजरातमधील प्रशासन त्यांच्या अधिसूचनांमध्ये मराठीचा वापर करत नसताना पालघर जिल्हा प्रशासनाला गुजरातीबाबत एवढा कळवळा का, असा रोखठोक प्रश्न विचारला जात आहे. परिणामी जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर भारतातील अनेक राज्यांमधून वाहने मुंबईकडे ये-जा करतात. अशा परिस्थितीत अधिसूचनेत गुजराती भाषेला प्राधान्य दिल्याने अनेकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुजरातीतील अधिसूचनेचे पत्रक समाजमाध्यमांवर ‘स्टेटस’द्वारे प्रसारित केल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरातमधील भिलाड येथे रेल्वे अंडरपाससाठी सिमेंट बोगद्याचे काम १८ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामामुळे संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, याबाबतची एक ओळीचीही स्पष्ट सूचना मराठीतून देण्यात आली नसल्याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मराठी भाषिक वाहनचालक या मार्गाचा नियमित वापर करतात. असे असताना वाहतूक नियंत्रणाच्या अधिकृत अधिसूचनेत मराठी भाषेला अपेक्षित प्राधान्य न दिल्याने प्रशासनाच्या भाषिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मराठीचा अवमान होत असल्याचा आरोप करत स्थानिक संघटना व नागरिकांकडून प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.