संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा करत युती तोडण्याची मागणी

Spread the love

संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा करत युती तोडण्याची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर

संभाजीनगर – राज्यातील महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी युती आणि आघाड्यांची बोलणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी झेडपी निवडणुकांच्या युतीला थेट विरोध दर्शवला आहे.

संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले.

वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसा गोंधळ छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता, तीच गत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्यापासून झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गटांपैकी २५ जागा या शिवसेना लढणार आणि २७ जागा भाजप लढणार आहे. सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील ११ ठिकाणी युती झाली नाही. त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार.सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यातील ११ जागांवर युती करणार नाही. मी स्वतंत्र लढणार असं शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे, तिथं युती झाली नाही, अशी माहिती शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon