ठाणे पोलिसांची तत्परता; रिक्षेत हरवलेली पर्स ₹१८ हजारांसह महिलेला सुरक्षित परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरात ठाणे पोलिसांच्या तत्पर व विश्वासार्ह कार्यवाहीचे पुन्हा एकदा सकारात्मक उदाहरण समोर आले आहे. मंगळवारी सकाळी मोहन नॅनो ते रेल्वे स्टेशनदरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना एका महिलेची पर्स हरवली होती. पर्समध्ये ₹१८,००० रोख रक्कम होती.
घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत संबंधित रिक्षाचा शोध घेतला. पोलिसांच्या प्रयत्नातून रिक्षाचालक सुरेश कुमार यांचा शोध घेण्यात यश आले. तपासादरम्यान पर्समधील संपूर्ण ₹१८,००० रोख रक्कम सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ठाणे पोलिसांनी ही पर्स संबंधित महिलेकडे सुरक्षितपणे सुपूर्द केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांच्या तत्परतेबद्दल व प्रामाणिक कार्यवाहीबद्दल महिलेने समाधान व्यक्त केले.
ठाणे पोलिसांचा “विश्वास, सेवा व तत्परता” हा ब्रीदवाक्य नागरिकांसाठी केवळ घोषवाक्य नसून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.