कुर्ल्यात फेरीवाल्यांचा राडा! गाडी लावण्याच्या वादातून भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; ३ जण गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. गाडी लावण्याच्या वादातून फेरीवाल्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात भाजपचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये फेरीवाले टोळक्याने कार्यकर्त्यांवर काठ्या व हातांनी हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या प्रकरणी भाजपकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, कुर्ला पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.