कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई; १५ लाखांच्या १७ चोरीच्या दुचाकी हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
कराड : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या तब्बल १५ लाख रुपये किमतीच्या १७ दुचाकी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये तरुणांमध्ये आजही लोकप्रिय असलेली यामाहा RX 100 तसेच इतर विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. या दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीस गेल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये होती.
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत ही कारवाई केली. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत सखोल चौकशीनंतर दुचाकी चोरीचे जाळे उघडकीस आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना दुचाकी पार्किंग करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. चोरीस गेलेल्या दुचाकींची ओळख पटवून त्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.