वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऐतिहासिक आंदोलन

Spread the love

वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऐतिहासिक आंदोलन

पोलीस महानगर नेटवर्क

पालघर : प्रस्तावित वाढवण बंदरासह परिसरातील विविध महाप्रकल्पांविरोधात पालघर जिल्ह्यात आज अभूतपूर्व जनआंदोलन उभे राहिले. हजारो नागरिकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारच्या विकास धोरणांना तीव्र विरोध दर्शवला. पालघरच्या इतिहासातील हे सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक मानले जात आहे.

या मोर्चात मच्छिमार व मच्छिमार महिला, आदिवासी बांधव, डायमेकर कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध समाजघटकांचा एकत्रित आणि ठाम विरोध या आंदोलनातून प्रकर्षाने दिसून आला.

आंदोलकांनी वाढवण बंदरासह प्रस्तावित विमानतळ, मुरबे बंदर, केळवे वस्त्रोद्योग (टेक्सटाईल) पार्क आणि तथाकथित ‘चौथी मुंबई’ या प्रकल्पांना कडाडून विरोध केला. हे प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या घातक असून सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक आहेत. स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर आणि अस्तित्वावरच या प्रकल्पांमुळे घाला पडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

लोकांच्या उपजीविका, पर्यावरणीय समतोल, घटनात्मक हक्क आणि स्थानिक संमती डावलून राबवला जाणारा विकास स्वीकारार्ह नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. जनसुनावण्यांतील त्रुटी, अपुरे व दिशाभूल करणारे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल, तसेच आदिवासी, किनारी व पारंपरिक समुदायांच्या हक्कांकडे केलेले दुर्लक्ष यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला.

या आंदोलनातून शासन व प्रकल्प प्रायोजकांना स्पष्ट संदेश देण्यात आला की पालघरची जमीन, समुद्र, पर्यावरण आणि भवितव्य उद्ध्वस्त करणारा विकास पालघरकर कदापि मान्य करणार नाहीत. सर्व विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करून लोककेंद्रित, पर्यावरणपूरक व शाश्वत विकास धोरण राबवावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.

जनतेचा आवाज दुर्लक्षित केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. “ये तो सिर्फ झांकी है, मुंबई अभी बाकी है,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon