पुणे महापालिका निवडणूक : येवलेवाडीत रोकड व संशयास्पद साहित्य जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहरात मोठी कारवाई केली. येवलेवाडी परिसरात मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कम आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
खाडीमशिन चौक परिसरात रात्री सुमारे नऊच्या सुमारास आचारसंहितेचा भंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई केली. घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन एसयूव्ही वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित साहित्य आढळून आले.
पहिल्या वाहनात ५०० रुपयांच्या नोटांची दोन बंडले, म्हणजेच एकूण एक लाख रुपये रोख सापडले. दुसऱ्या वाहनात मतदारांच्या याद्या, २५५ पांढऱ्या आणि ८० खाकी रंगाच्या रिकाम्या पाकिटांसह २१ लहान व आठ मोठ्या वह्या जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेली रोकड आणि रिकामी पाकिटे पाहता ही रक्कम मतदारांना वाटप करण्यासाठी आणली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही रोकड आणि वाहने नेमकी कोणाची आहेत, तसेच कोणत्या पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी वापरली जाणार होती, याचा तपास पोलीस आणि निवडणूक अधिकारी करीत आहेत.
या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.