चांदिवलीतील साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग; दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

Spread the love

चांदिवलीतील साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग; दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईत एका बाजूला राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे अंधेरीतील एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. अंधेरी पूर्व परिसरातील साकीविहार रोडवर असलेल्या एका व्यावसायिक इमारतीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. नारायण प्लाझा असे चांदिवली परिसरातील इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे लाखो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

मुंबई अग्निशमन दलाला बुधवारी सायंकाळी ६:३६ च्या सुमारास साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याची माहिती मिळाली होती. नारायण प्लाझा या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नियोसेल इंडस्ट्रीज (युनिट क्र. ३०३) या कंपनीत आग लागली होती. या कार्यालयातील फर्निचर आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण मजल्यावर दाट धूर पसरला होता. आता घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने सायंकाळी ६:५४ वाजता याला लेव्हल-१ ची आग घोषित केले.

यावेळी अग्निशमन दलाने तातडीने इमारत रिकामी केली. या बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना कार्यालयात दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा अंत झाला. भगवान पिटले (३०) यांना सेवन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले, तर सुमंत जाधव (२८ वर्ष) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाट धुरामुळे श्वास गुदमरल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, ही आग सुमारे १५०० चौरस फूट परिसरात पसरली होती. आगीत कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचर, फॉल्स सीलिंग, लिथियम-आयन बॅटरी आणि महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्या. लिथियम बॅटरीमुळे आग विझवण्यात अडथळे येत होते, मात्र शर्थीच्या प्रयत्नांनंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon