रंगोली साडीच्या मालकावर अश्लील बनावट व्हिडीओद्वारे बदनामीचा आरोप; ठाण्यातील जैन समाजात खळबळ
ठाणे : प्रतिष्ठित ओसवाल जैन समाजातील ज्येष्ठ समाजनेत्याची बदनामी करण्यासाठी अश्लील बनावट व्हिडीओ तयार करून तो समाजात व्हायरल केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. श्री. ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष वसणजी लखमशी कारीया (वय ६३) यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात रंगोली साडी चा मालक रसिक प्रेमजी बोरीचा (वय ५३) व त्याच्या काही साथीदारांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कारीया यांचा फोटो मॉर्फ करून त्यांना एका महिलेसोबत अश्लील अवस्थेत दाखवणारा बनावट व्हिडीओ तयार करण्यात आला. या व्हिडीओसोबत बदनामीकारक मजकूर जोडून, बनावट सिमकार्ड व वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांच्या माध्यमातून तो समाजातील विविध गटांमध्ये प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.
सूडबुद्धीची पार्श्वभूमी?
या घटनेमागे जुना वाद असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २०२३ मध्ये समाजहिताच्या मुद्द्यावरून वसणजी कारीया यांनी रसिक बोरीचा यांच्याविरोधात संघाकडे तक्रार करत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर संघात बैठक व चर्चा झाली. याच घटनेतून सूडबुद्धीने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
टोळीचा सहभाग असल्याचा दावा
या प्रकरणात केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संगनमताने टोळी कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कांतीलाल जुठालाल बोरीचा, मुरजी जुठालाल बोरीचा, समुभा गोवुबा जाडेजा आणि राहुभा गोडजी भाटी यांची नावे तक्रारीत नमूद असून, सर्वांनी मिळून बदनामीचे कटकारस्थान रचल्याचा दावा आहे.
गंभीर कलमान्वये गुन्हा
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५६, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(क), ६७(अ) नुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ही कलमे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित असून कठोर शिक्षेची तरतूद आहे.
समाजाचा संताप, कारवाईची मागणी
या घटनेनंतर ओसवाल जैन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, “हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण समाजाच्या प्रतिष्ठेवरचा घाव आहे,” अशी प्रतिक्रिया समाजातील ज्येष्ठांकडून व्यक्त केली जात आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू असून, फिर्यादी व साक्षीदारांना समन्स देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचे हे गंभीर उदाहरण ठरत असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.