ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी ‘वाहतूक सुरक्षा रील्स’ उपक्रम; सर्वोत्तम रील्सना बक्षिसे
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरात वाढत्या वाहतूक अपघातांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘क्रिएटिव्ह रील्स बनवा… बक्षीस मिळवा!’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ‘रस्ता सुरक्षा अभियान–२०२६’ अंतर्गत राबवण्यात येणारी ही रील्स स्पर्धा ५ ते १० जानेवारीदरम्यान होणार आहे.
या उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, सुरक्षित वाहनचालना, पादचारी सुरक्षा तसेच ट्राफिक सिग्नल्स यांसारख्या विषयांवर आधारित रील्स तयार कराव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. तयार केलेल्या रील्स इंस्टाग्रामवर अपलोड करून ‘pdc_org’ या अधिकृत पेजला टॅग करणे आवश्यक असून, त्यामध्ये स्वतःचे नाव, महाविद्यालयाचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
ठाणे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून, स्पर्धेतून निवडल्या जाणाऱ्या सर्वोत्तम रील्स तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, रील्स तयार करताना कोणत्याही प्रकारे जीव धोक्यात घालू नये आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट आवाहन वाहतूक विभागाने नागरिकांना केले आहे.