निवडणूक काळात चेंबूरमध्ये अवैध वेश्याव्यवसाय फोफावत असल्याचा आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Spread the love

निवडणूक काळात चेंबूरमध्ये अवैध वेश्याव्यवसाय फोफावत असल्याचा आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

रवि निषाद | मुंबई

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमधील छेडा नगर परिसरात अवैध वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. छेडा जय अंबे नगर मुख्य महामार्गावर दिवसाढवळ्या सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जिजा माता भोसले चौक परिसरात काही महिलांकडून सर्रास ग्राहक शोधले जात असून, त्यांना जवळच्या लॉजिंगमध्ये नेले जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. चेंबूरसारख्या वर्दळीच्या आणि शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या कथित अवैध व्यवसायामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी यापूर्वीही पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही ठोस कारवाई का होत नाही, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष की हेतुपुरस्सर मौन, असा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात २० पेक्षा अधिक लॉजिंग-बोर्डिंग अवैधरीत्या सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाही अद्याप कोणतीही मोठी कारवाई, छापे किंवा सखोल चौकशी झालेली नाही. त्यामुळे या व्यवसायाला कुणाचे अभय आहे का, अशी शंका बळावत आहे. साफल्य, आश्रय, रॉयल रेसिडेन्सी, साई लॉजिंग, साई लीला, पिकनिक स्पॉट, स्वागत, सपना, हर्षा, पाल्म आणि साई मानव यांसह इतर काही लॉजिंगमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे.

निवडणुकीच्या काळात शहरात शिस्त, सुरक्षा आणि पारदर्शकतेची अपेक्षा असताना, शहराच्या मध्यभागीच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे आरोप गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पोलीस प्रशासन व महापालिकेने तातडीने स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीच्या काळातच कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका संबंधित यंत्रणांवर बसू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon