वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करुन फरार आरोपीला अखेर मुंब्य्रातून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – वसईतील वाघरा पाडा भागात राहणाऱ्या पुष्पा अशोक विश्वकर्मा (४२) या बहिणीवर गोळीबार करून मुंब्य्रातील एका घरात दडून बसलेल्या शिवदयाळ विश्वकर्मा (४५) या आरोपीला अटक केल्याची माहिती वालीव पोलिसांनी शनिवारी दिली. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या घरात जिवंत हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
मुंबईच्या पंतनगरमध्ये असताना शिवदयाळ याने त्याच्या पत्नीचा २०१८ मध्ये खून केला होता. याच खून प्रकरणात तो कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने बहीण पुष्पा हिला न्यायालयाच्या तारखेदरम्यानच्या भेटीत जामिनावर सोडण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्याने वकिलाचा दीड ते दोन लाखांचा खर्चही तिला करण्यास सांगितला. सुटून आल्यानंतर पैशांची परतफेड करेन, असेही त्याने सांगितले. याच विश्वासाने पुष्पाने त्याच्या जामिनासाठी खर्च करून त्याला सोडवले. जामिनावर त्याची सुटका झाल्यानंतर तिने त्याच्याकडे खर्च केलेल्या पैशांची मागणी केली. हे पैसे देण्याऐवजी तो ३ जानेवारी २०२६ पहाटे अडीचच्या सुमारास वाघरा पाड्यातील तिच्या घरी गेला. घराच्या खिडकीतूनच तिच्याशी तो वाद घालत असताना तिच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले. सुदैवाने, त्याने गोळी झाडण्याच्या वेळीच तिने खिडकी बंद केली. ही गोळी काचेतून घरातील संगणकाला लागली.
याप्रकरणी तिने वालीव पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोरखनाथ जैध आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वासराव बाबर यांच्या पथकाने मुंब्य्राजवळील दिवा परिसरातील एका घरात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्याचे लोकेशन ट्रेस केले. तो ज्या घरात मिळाला त्याच घरातून पोलिसांनी हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी कट्टाही हस्तगत केला. त्याच्याकडे शस्त्रसामग्री मिळाल्याचा दुसरा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.