ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५२ गुन्हे उघड, ३० लाखांचे सोनं जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर, मुंबई, नवी मुंबई आणि कर्नाटक राज्यात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व सोनसाखळ्या जबरदस्तीने खेचून चोरी करणाऱ्या तसेच बतावणी करून दागिने हडप करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक–३ (कल्याण) पथकाने अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ५२ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ३० लाख ६ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या समांतर तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कासिम गरिबशहा इराणी (३८) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (३२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयीन परवानगीने त्यांना अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली. चौकशीत त्यांनी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई तसेच कर्नाटकातील विविध ठिकाणी जबरी चैन स्नॅचिंग व फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासात हिललाईन, कोळसेवाडी, कळवा, बदलापूर, कापुरबावडी, अंबरनाथ, खडकपाडा, पनवेल, खारघर, सानपाडा, नेरूळ, सीबीडी, साकीनाका, धारावी आदी पोलीस ठाण्यांतील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला. तसेच कर्नाटकातील बदामी, आदर्शनगर, अफजलपूर येथील गुन्ह्यांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या कारवाईचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत असून, ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा, घटक–३, कल्याण येथील अधिकारी व अंमलदारांनी ही उल्लेखनीय कारवाई केली.