नवीन वर्षात व्यापारी, फळ बागायतदार, छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका; पालघर रेल्वे स्थानकातील रेल्वे पार्सल सेवा बंद
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पश्चिम रेल्वेने पालघर रेल्वे स्थानकात असलेली रेल्वे पार्सल सेवा तोट्यात असल्याचे सांगत नववर्षाच्या सुरुवातीलाच अचानक बंद केली आहे. त्यामुळे हजारो व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, फळ बागायतदार, आदिवासींचे नुकसान झाले आहे. पालघर रेल्वे स्थानकातील पार्सल घराला कुलूप ठोकून दरवाजावर केवळ ‘डीआरएफ यांच्या आदेशाने’ अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे.
पालघर, बोईसर, डहाणू वाणगाव, सफाळा रेल्वे स्थानकातून सुरू असलेली ही रेल्वे पार्सल सेवा गरीब मच्छिमार, फुलविक्रेते, शेतकरी, फळबागातदार, छोटे व्यापारी यांची जीवनवाहिनी आहे. या रेल्वे पार्सल सेवेद्वारे स्वस्त दरात आणि जलदगतीने देशभरातच नव्हे तर जगभरात माल पोहोचवला जात होता. मात्र एका आदेशात ही सेवा बंद करताना त्याचे परिणाम काय होतील, व्यवसायावर किंवा त्यांच्या दररोजच्या कामाला किती फटका बसेल याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचा संताप स्थानिक व्यापारी करत आहेत.
पालघर तालुक्यातील माहीम व केळवे येथील विड्याची पाने, केळीचे पाने, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, मासे, चिकू गुजरात राज्यातून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थांसारखी कृषी उत्पादने, कोंबडी, बकरीसारखी जनावरे आणि मोटरसायकल यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. आता ही सेवा बंद झाल्याने व्यापाऱ्यांना वसई किंवा वापी येथे जाऊन पार्सल पाठवावे लागणार आहे किंवा पार्सल आल्यास घेण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि कष्टात वाढ होणार आहे.
अल्प उत्पन्न हे एकमेव कारण रेल्वे प्रशासनाने दिले असले तरी ही सेवा महत्त्वाची होती. गरिबांचा रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही पार्सल सेवा कार्यरत होती, मात्र महसुलाच्या आकड्यामुळे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याची टीका होत आहे.