ठाण्यात अर्ज छाननीवरून संग्राम; विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करण्याचा मनसेचा आरोप

Spread the love

ठाण्यात अर्ज छाननीवरून संग्राम; विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करण्याचा मनसेचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची प्रक्रिया गती धरत असताना अर्ज छाननीवरून ठाण्यात वाद पेटला आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले जाण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे अर्ज ठरवून बाद केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून विरोधकांना पायबंद घालण्याचा कट रचल्याचा आरोप केला.

जाधव म्हणाले, “अनेक ठिकाणी छाननीदरम्यान पक्षपातीपणा दिसून येत आहे. पडताळणीपूर्वी फक्त अर्धा तास अर्ज डिस्प्लेला ठेवले जातात. मात्र ठाण्यात सकाळी ११ वाजता अपेक्षित असलेले अर्ज दुपारी ३.३० नंतर लावण्यात आले. काही शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या अर्जात कोऱ्या जागा असूनही ते ग्राह्य धरले गेले; पण विरोधकांच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली,” असा आरोप त्यांनी केला.

सत्ताधारी पक्षाचा एकही अर्ज बाद न करता विरोधक आणि अपक्षांच्या अर्जांवरच गंडांतर आणल्याचा मनसेचा आरोप आहे. “ही निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट पद्धतीने राबवली जात असून अनेक कार्यकर्त्यांच्या दशकभराच्या मेहनतीवर पाणी फेरण्यात आले. अशा निवडणुकीत भाग घेऊन नेमकं काय साध्य करायचं?” असा सवाल मनसेने उपस्थित केला.
दरम्यान निवडणूक यंत्रणेवर पक्षाच्या हस्तक्षेपाचा मनसेने आरोप केल्यानंतर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon