बुधवारी भर दिवसा जिल्हा हादरवणाऱ्या बंटी जहागीरदार हत्याकांडाचा पर्दाफाश; दोन्ही आरोपी गजाआड
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – श्रीरामपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या हाजी बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या24 तासांत मोठी कामगिरी करत दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार करून शहरात दहशत माजवणारे रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. श्रीरामपूर येथील हाजी बंटी जहागीरदार (५३) हे कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना, कॉलेज रोडवरील सेंट लुक हॉस्पिटलच्या गेटसमोर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला. या निर्घृण हल्ल्यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली, आणि श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या हत्येनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मारेकरी कोण? हत्या का? याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत आरोपींचा माग काढला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके रवाना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.