पायधुनी पोलिसांची मोठी कारवाई; ३६ कोटींच्या हेरॉईनसह आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश

Spread the love

पायधुनी पोलिसांची मोठी कारवाई; ३६ कोटींच्या हेरॉईनसह आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : पायधुनी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठा धडक दिला असून आंतरराज्य हेरॉईन तस्करी रॅकेटचा भंडाफोड करत तब्बल ३६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात हेरॉईन, रोख रक्कम, वाहन व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २०२५ रोजी पी. डी’मेलो रोड, मस्जिद बंदर (पूर्व) परिसरातून जलाराम नटवर ठक्कर (३७) आणि वसीम मजरुद्दीन सय्यद (२७) यांना ३२६.२२ ग्रॅम हेरॉईनसह पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात पुरवठा साखळी उलगडत गेली आणि रुबिना मोहम्मद सय्यद खान व शबनम शेख या दोघींनाही अटक झाली. शबनम शेख हिला राजस्थानमधील अजमेरहून तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.

यानंतर मस्जिद बंदर परिसरातून फरार आरोपी मुस्कान समरुल शेख (१९) हिलाही पकडण्यात आले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहरबान अली हा मुख्य पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच दिशेने तपास पुढे सरकत २४ डिसेंबरला अब्दुल कादिर शेख याला लावलेल्या सापळ्यातून पकडण्यात आले. त्याच्याकडून १.३८ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले.

तपासाचा धागा ओशिवरा येथील आनंद नगरपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी छापा टाकून नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी आणि समद गालीब खान यांना हेरॉईनच्या पुड्या तयार करताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ३३ कोटी ८६ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले.

एकूण ८ किलो ८३२ ग्रॅम हेरॉईन (किंमत अंदाजे ३६.५५ कोटी रुपये), रोख, कार, मोबाईल असे मिळून सुमारे ३६.७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आतापर्यंत ६ पुरुष व ३ महिला आरोपींच्या अटकेसह अमली पदार्थांच्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पायधुनी पोलिसांना यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon