बनावट ‘फोन पे’ ॲपद्वारे सराफा व्यावसायिकाची फसवणूक; दोन सराईत गुन्हेगार अटकेत

Spread the love

बनावट ‘फोन पे’ ॲपद्वारे सराफा व्यावसायिकाची फसवणूक; दोन सराईत गुन्हेगार अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : सोन्याची अंगठी खरेदी केल्यानंतर बनावट ‘फोन पे’ ॲपवरून पैसे भरल्याचे भासवून सराफा व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून सोन्याची अंगठी आणि दुचाकीसह एकूण १.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंजनगाव सुर्जी येथील गोपाल नगर भागात राजेश जानराव बैतुले यांचे ‘गुणगुण ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी दोन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्याचा बहाणा करत ४८ हजार रुपये किमतीची ३.३२० ग्रॅम वजनाची अंगठी पसंत केली. पैसे देताना आरोपींनी मोबाईलवरील बनावट ‘फोन पे’ ॲपवर व्यवहार यशस्वी झाल्याचे दाखवले आणि पैसे खात्यात जमा झाल्याचा आभास निर्माण करून दुचाकीवरून पसार झाले. काही वेळाने बँक खाते तपासल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बैतुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून महाजनपुरा परिसरातून उमेर मिर्झा जाफर बेग मिर्झा (३६, रा. सागर नगर, हैदरपुरा) आणि मोहम्मद शोएब मोहम्मद शकील (३६, रा. नालसाबपुरा, अमरावती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून यापूर्वी नागपूर व वाशीम जिल्ह्यातही अशाच प्रकारे व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या कारवाईमुळे बनावट पेमेंट ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, डिजिटल व्यवहार स्वीकारताना केवळ ग्राहकाच्या मोबाईल स्क्रीनवर विश्वास न ठेवता, स्वतःच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस प्राप्त झाला आहे का, अथवा बँकेच्या अधिकृत ॲपमध्ये व्यवहाराची नोंद दिसते का, याची खात्री केल्यानंतरच माल देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon