नागपुरात भल्या सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघांवर झाडल्या गोळ्या
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – बुधवारी सकाळी गोळीबाराच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे गोळीबाराची एक थरारक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने एका प्राध्यापकासह दोन जणांना अंदाधुंद फायरींग केला. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, गुमगाव परिसरात बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. गावातील गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी जुना घरगुती वाद होता. याच वादाचे पर्यावसान हिंसक वळणात झाले. रागाच्या भरात असलेल्या आरोपी गज्जूने थेट बंदूक काढून गोळीबार सुरू केला.
या गोळीबारात प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे आणि त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गोळी लागल्याने जखमी झाला आहे. आरोपीने एकूण दोन राऊंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एका जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भरदिवसा आणि भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गज्जू याने कोणत्या कारणावरून इतकं टोकाचं पाऊल उचललं आणि त्याच्याकडे शस्त्र कोठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत.