चंद्रपूर ते कंबोडिया किडनी रॅकेटचा पर्दाफास!

Spread the love

चंद्रपूर ते कंबोडिया किडनी रॅकेटचा पर्दाफास!

इंजिनिअरचा प्रत्येक किडनीमागे १ लाख कमिशन; बोगस डॉक्टरच्या माध्यमातून आतापर्यंत १२ किडण्या विकल्या

योगेश पांडे / वार्ताहर

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू होऊन देशातील पाच राज्यांपर्यंत पसरलेल्या कंबोडिया किडनी रॅकेटबाबत मोठा खुलासा समोर आलाय. या संपूर्ण नेटवर्कचा मुख्य एजंट कृष्णा उर्फ रामकृष्म मल्लेश सुंचू याला सोलापूर जिल्ह्यातून अटक करण्यात आलीय. पेशाने इंजिनिअर असलेल्या कृष्णाने स्वतःची मूळ ओळख बदलली होती आणि लोकांना तो डॉक्टर असल्याचे सांगायचा, अशा पद्धतीने परदेशातील बेकायदेशीर किडनी विक्रीचा कृष्णा मोठा एजंट बनला होता. प्रत्येक किडनी व्यवहारासाठी त्याला १ लाख रुपये इतके कमिशन मिळायचं, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

आरोपी कृष्णा हा डॉक्टर नसून इंजिनिअर आहे. कपड्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वात वळला. सुरुवातीला त्याने स्वतःची किडनी विकली, नंतर त्याला एक नेटवर्क मिळाले. याद्वारे तो लोकांना किडनी विकण्यासाठी आमिष दाखवू लागला. प्रत्येक किडनी व्यवहारामागे कृष्णाला १ लाख रुपयांचे कमिशन मिळत असे.

कृष्णाच्या माध्यमातून जवळपास १२ लोकांनी कंबोडियातील ‘प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटल’ (मिलिटरी हॉस्पिटल),फ्नॉम पेन्हमध्ये आपल्या किडनी विकल्या आहेत. कृष्णा गरजूंना, गरिबांना आणि कर्जबाजारी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवत असे.

चंद्रपुरातील शेतकरी रोशन कुडे यांनी डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी करण्यासाठी किडनी विकण्याचा मार्ग स्वीकारला. फेसबुकच्या माध्यमातून कुडे कृष्णाच्या संपर्कात आले. कृष्णाने त्यांना ८ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवलं. कोलकातामध्ये दोघांची पहिली भेट झाली, येथेच पहिली वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर रोशनला कंबोडियामध्ये पाठवण्यात आलं आणि त्याची किडनी काढण्यात आली. रोशन कुडेंच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये दोन सावकारांकडून त्याने ५० हजार रुपये कर्ज घेतले होते, ज्याची वसुली रक्कम व्याजासह ७४ लाख रुपये इतकी झाली होती. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला, यानंतर एकूण सहा सावकारांना अटक करण्यात आली.

भारतातील अनेक राज्यांमध्ये ही टोळी सक्रिय होती, उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याशीही कनेक्शन उघड झालंय.अटकेच्या कारवाईदरम्यान कृष्णा सोलापुरात ओळख बदलून राहत असल्याची माहिती उघड झाली. स्थानिकांना त्याने डॉक्टर असल्याचे सांगितलं होतं. त्याचे खरं नाव रामकृष्ण मल्लेश सुंचू असे आहे. मंगळवारी रात्री कृष्णाला न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळेस त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये आणखी काही मोठे चेहरे समोर येऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon