राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफास; बीड पोलिसांनी सिनेस्टाईल केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून गुन्हेगारी वस्तीवर छापा टाकला.ड्रोन कॅमेराद्वारे रेकी करून शंभर पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेरा टाकत चोरट्यांना अटक केल्याने जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईची चर्चा रंगली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे चोरटे आश्रय घेत होते. त्यामुळे येथे जाण्यास पोलीस देखील धजावत असे. मात्र, बीड आणि धाराशिव पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने टोळी सदस्यांना अटक केली.
मागील काही दिवसात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केली जात होती. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये दहशत होती.अखेर या टोळीतील सदस्यांना अटक करत ११ तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील तिघे सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून आणखी तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांच्या गाड्यांचा ताफा हायवेवरुन आणि शेतातून चोरट्यांच्या ठिकाण्यावर पोहोचला, हे सर्व ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालं.धुळे-सोलापूर रस्त्यावर ४ डिसेंबर रोजी तेलंगणातील प्रवाशांची कार लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केल्याने नागरिकांतून समाधान होत आहे.