बसमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरणारी महिला अवघ्या तासाभरात गजाआड
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – भोर बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला भोर पोलिसांनी धडा शिकवला आहे आहे. बसमध्ये चढताना एका वयोवृद्ध महिलेचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला आरोपीला पोलिसांनी अवघ्या एका तासात बेड्या ठोकल्या आहेत. करिष्मा करण सकट असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
आंबाडे (कोळेवाडी) येथील रहिवासी असलेल्या भरत शिवराम रांजणे यांच्या मातोश्री भोर-स्वारगेट एसटी बसने प्रवास करण्यासाठी बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपी करिष्मा सकट हिने वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र अतिशय शिताफीने तोडले आणि तेथून पळ काढला.
दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच रांजणे यांनी तातडीने भोर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी तात्काळ तपास पथके तैनात केली. बसस्थानक परिसर आणि आजूबाजूच्या मार्गांवर पोलिसांनी सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली.पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या महिलेने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडे असलेले दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.