बनावट जेसीबी फायनान्स डीलच्या नावाखाली वाशीतील व्यावसायिकाची १४.१९ लाखांची फसवणूक
नागपूरमधील एजंटविरोधात गुन्हा; एपीएमसी पोलिसांकडून तपास सुरू
नवी मुंबई : फायनान्सद्वारे जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत नागपूर येथील एका एजंटने वाशीतील व्यावसायिकाची १४.१९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट बँक पेमेंट पावत्या पाठवून विश्वास संपादन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी भूषण रवींद्र पांडे (रा. नागपूर) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार संजयकुमार कलाल (वय ४६, रा. सेक्टर १६, वाशी) हे जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जून महिन्यात पांडे याने ‘चोलामंडलम फायनान्स’मार्फत जेसीबी मशीन फायनान्सवर देण्याचा प्रस्ताव देत २०.७० लाख रुपयांचा व्यवहार ठरवला.
विश्वास बसावा यासाठी आरोपीने फायनान्स कंपनीकडे १७.७० लाख रुपये जमा केल्याचे दर्शविणाऱ्या बनावट बँक पावत्या तक्रारदारास पाठवल्या. या कागदपत्रांवर विश्वास ठेवून कलाल यांनी ऑनलाइन पद्धतीने १४.५० लाख रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग केले. मात्र, रक्कम मिळाल्यानंतरही जेसीबी मशीन देण्यात आले नाही. वारंवार मागणी केल्यानंतर केवळ ४० हजार रुपये परत करण्यात आले, उर्वरित रक्कम अपहार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
फसवणूक लपविण्यासाठी आरोपीने पुन्हा १३.८० लाख रुपये परत केल्याचे दाखविणारी आणखी एक बनावट पावती पाठवून दिशाभूल केल्याचेही तपासात समोर आले आहे. अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच कलाल यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३३९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.