अहिल्यानगरमधील हत्येचा अखेर उलगडा !
दागिन्यांचा लोभात अपंग महिलेच्या खून प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह ४ महिलांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या थरकाप उडवणाऱ्या अपंग असलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या घटनेमागे दागिन्यांचा लोभ असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणात चार महिलांना जेरबंद केलं असून त्यातील दोन अल्पवयीन मुली असल्यानं खळबळ उडाली आहे.
मयत मनिषा बाळासाहेब शिंदे (४०) यांच्या गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने आरोपी महिलांनी थेट घरात घुसखोरी केली. दागिने बळजबरीने काढताना मनिषा यांनी आरडाओरड सुरू करताच, आरोपींनी गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली.
दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (२०) आणि अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (२२) यांच्यासह दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिव्या देशमुख ही मयत मनिषा शिंदे यांच्या शेजारीच राहायला होती आणि तिच्याकडे असलेल्या दागिन्यांची संपूर्ण माहिती तिला होती. हाच विश्वासघात मनीषा यांच्या मृत्यूचं कारण ठरला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.