कासा येथे पोलिस हवालदाराकडून महिलेसोबत लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात, प्रभारी निरीक्षकाची तात्काळ बदली
पोलीस महानगर नेटवर्क
कासा / पालघर : पालघर जिल्ह्यातील कासा येथे महाराष्ट्राला हादरवणारी आणि पोलिस यंत्रणेच्या प्रतिमेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनतेचे रक्षकच भक्षक ठरल्याचे भयावह चित्र समोर आले असून, एका पोलिस हवालदाराने तक्रारीच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवरच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी कासा पोलीस ठाण्यात आली होती. याचवेळी कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शरद भोगाडे नावाचा पोलिस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने तिला पोलीस ठाण्याच्या मागील खोलीत नेले. याच ठिकाणी त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
घटना घडल्यानंतर पीडित महिलेने मोठे धाडस दाखवत थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रथम डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपी पोलिस हवालदार शरद भोगाडे याच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची तात्काळ जिल्हा मुख्यालयात बदली केली असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
या संतापजनक घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात असून, दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस खात्यातील शिस्त आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.