भामटा अमित शेट्टी अखेर पनवेल पोलिसांच्या जाळ्यात; कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश
पनवेल : पनवेल, पुणे, श्रीवर्धन, म्हसळा परिसरात ‘दामदुप्पट योजना’, बनावट कर्ज स्कीम, दुसऱ्याच्या नावावर मोबाईल लोन काढून फोन विक्री, क्रेडिट कार्डद्वारे आर्थिक अपहार तसेच दुचाकी–चारचाकी वाहने बळकावण्यासारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांमध्ये कुख्यात असलेला भामटा अमित अशोक शेट्टी (वय अंदाजे ३५) याला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून गरीब व गरजू नागरिकांना विविध आर्थिक योजनांचे आमिष दाखवून फसवत होता. त्याने शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वीही शेट्टीविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असतानाही तो महागडे मोबाईल, ब्रँडेड घड्याळे, मौल्यवान भेटवस्तू तसेच परदेशी सहलींच्या खर्चाच्या माध्यमातून काही वरिष्ठ व तपास अधिकाऱ्यांना प्रभावित करून कारवाईतून सुटत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बी.एन.एस. कलम ३१८(४), ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आणखी अनेक फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यापूर्वी शेट्टीला सोडून देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून स्वतंत्र चौकशी नेमावी, अशी जोरदार मागणी तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
अमित शेट्टीकडून आपली किंवा आपल्या परिचितांची फसवणूक झाली असल्यास त्वरित पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा संबंधित हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलातील अंतर्गत भ्रष्टाचारावरही सवाल उपस्थित झाले आहेत.