रस्त्यावर महिला ट्रॅफिक पोलीस आणि निर्भया पथक तत्पर; मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेला बळ
रवी निषाद / मुंबई
मुंबई : वाढत्या छेडछाडी व लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस दलाकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. निर्भया पथक तसेच ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांमुळे मुंबईतील मुली आणि महिला रस्त्यावर स्वतःला अधिक सुरक्षित समजत आहेत.
शहरातील संवेदनशील ठिकाणी, शाळा-महाविद्यालय परिसर, बाजारपेठा तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे महिलांवरील गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई पोलीस दलातील महिला कर्मचारी सोशल मीडियावरही सक्रिय असून,Instagram आणि Facebook सारख्या माध्यमांद्वारे जनजागृती करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे तरुण मुलींनाही पोलीस दलात सेवेसाठी प्रेरणा मिळत असून, पोलीस भरतीकडे अधिकाधिक मुली आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
निर्भया पथक आणि ट्रॅफिक विभागात महिलांचे प्रमाण वाढविल्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, मुंबईतील महिला वर्ग समाधान व्यक्त करत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून राबवले जात असलेले हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.