भाजप आमदार सुरेश धस यांच्यापासून जीवाला धोका असल्याचा ॲड. असीम सरोदेंचा दावा; राम खाडे हल्ला प्रकरणामुळे बीडमध्ये खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नामवंत वकील ॲड. असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा केला आहे. राम खाडे यांच्यावर १० ते १५ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून आरोप–प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यात राम खाडे यांना तब्बल १७ वार करण्यात आले. त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. घटनेनंतर त्यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी थेट आमदार सुरेश धस यांच्यावरच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला. मात्र, धस यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
“माझ्याही जीवाला धोका” — ॲड. सरोदे
ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “राम खाडे गेल्या पाच वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत. देवस्थानच्या जमिनीतील भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कागदपत्रांसह माहिती दिली होती. आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून तब्बल १,००० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.”
सरोदे यांनी पुढे सांगितले की या प्रकरणात पोलिस आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनीही मदत केल्याचा आरोप आहे. त्यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती; मात्र “आमदार सत्ताधारी असल्याने ईडी किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही”, असा दावा त्यांनी केला.
खाडे यांनी त्यानंतर संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला, मात्र कोणालाही अटक झाली नाही, असे सरोदे म्हणाले. प्रकरणाशी संबंधित अनेक धमक्या मिळत असल्याचा उल्लेख करत त्यांनी “आता माझ्या जीवालाही धोका आहे” असा आरोप केला.
ॲड. सरोदे यांच्या मते, काही महिन्यांपूर्वी राम खाडे यांच्या शेतातील शेडवर व नातेवाईकांवर हल्ले झाले होते. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे खाडे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केल्यावर काहीकाळ सुरक्षा देण्यात आली होती. मात्र ती नंतर मागे घेण्यात आली.
राम खाडे यांच्यावर झालेला ताज्या हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत. मोठ्या आर्थिक गैरव्यवहार, राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि आता प्राणघातक हल्ला. या सर्व घटनांमुळे प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने वळेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अनेक पथके शोधमोहीमेत गुंतली आहेत. अधिकृत स्तरावर कोणाचेही नाव तपासात असल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. राजकीय तणाव, गंभीर आरोप आणि हल्ल्यांची मालिका यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.