कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण शहरात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. येथील एका २९ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आणि तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर खडकपाडा पोलिसांनी आरोपी प्रियकर विनीत गायकरला कल्याण पश्चिमेतील फडके मैदान परिसरातून सापळा रचून बेड्या ठोकल्या.
आरोपी विनीत गायकर याने पीडित २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एवढेच नाही, तर त्याने तिचा मोबाईल हॅक करून तिचे खासगी आणि अश्लील व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओंचा वापर करून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्यावर अत्याचार करत होता.
आरोपी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याने सुरुवातीला राजकीय बळाचा वापर करून पीडित तरुणीवर दबाव टाकण्याचा आणि पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित मुलीची तक्रार नोंदवून घेतली. आरोपीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग तसेच अन्य संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल झाल्याची कल्पना येताच आरोपी गायकर फरार झाला होता. पोलिसांनी तब्बल १.५ महिन्यांच्या पाठलागानंतर त्याला फडके मैदान परिसरातून अटक केली.
आरोपीला अटक केल्यानंतर कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पुढील ३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खडकपाडा पोलीस आता या आरोपीने अशाच प्रकारे अन्य किती मुलींना ब्लॅकमेल केले आहे किंवा त्यांच्यावर अत्याचार केले आहेत, याचा कसून तपास करत आहेत.